ब्रेकिंग! इंडिया आघाडीत ठिणग्या!
राजधानी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत. मात्र या निवडणुकीआधीच सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीत आप आहे. लोकसभा निवडणुकीतही दिल्लीत दोन्ही पक्षांनी आघाडी करून निवडणूक लढली होती. परंतु, आता मैत्रीची जागा वादाने घेतली आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना अँटी नॅशनल म्हटले. त्यांच्या या शब्द प्रयोगामुळे आम आदमी पार्टीचे नेते चांगलेच भडकले आहेत. काँग्रेसने माकन यांच्यावर चोवीस तासांच्या आत कारवाई करावी, अशी मागणी आप नेत्यांनी केली आहे.
माकन यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेतली. आतिशी म्हणाल्या, काँग्रेसची वक्तव्ये आणि त्यांच्याकडून सध्या सुरू असलेल्या हालचाली पाहिल्या तर स्पष्ट होत आहे की, काँग्रेसने भाजपशी साटेलोटे केले आहे. माकन म्हणतात की, केजरीवाल अँटी नॅशनल आहेत. त्यांनी असा आरोप भाजपच्या नेत्यांवर कधी केला आहे काय, असा सवाल आतिशी यांनी उपस्थित केला.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते संजय सिंह म्हणाले, दिल्लीत काँग्रेस पक्ष भाजपच्या बाजूने उभा राहिला आहे. काँग्रेस सध्या अशीच कामे करत आहे, ज्यामुळे भाजपला फायदा होईल. आता सर्वच मर्यादा पार झाल्या आहेत. माकन यांनी मोठी चूक केली आहे. आता काँग्रेसने २४ तासांच्या आत त्यांच्यावर कारवाई करावी. जर काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही अन्य पक्षांना सांगू की, काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढा, असा इशारा सिंह यांनी दिला आहे.