कर्नाटकची मुजोरी, महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात ‘नो एन्ट्री’

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटत असताना आता या दोन्ही राज्यांत हिवाळी अधिवेशन सुरु आहे. कर्नाटक विधानसभेचे हिवाळी बेळगावात सुरु होत आहे. या अधिवेशनापूर्वी आज महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी बांधवांच्या न्याय हक्कांबाबत आवाज उठवण्यासाठी व्हॅक्सीन मैदानावर जाहीर मेळाव्याचं आयोजन केले होते. मात्र कर्नाटक पोलिसांनी अचानक मेळाव्यास परवागनी नाकारली आहे.
कर्नाटकात कलम 144 लागू करण्यात आले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांनाही कर्नाटकात येण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही महाराष्ट्रातील नेते बेळगावाच्या दिशेने रवाना झाले आहेत. एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्य़ात घेतले आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत दरवर्षी बेळगावात जाहीर मेळावा होतो. यंदाही हा मेळावा आज होणार होता, ज्यासाठी पूर्ण तयारी झाली होती. या मेळाव्याला प्रशासनाने परवानगी दिल्याचेही एकीकरण समितीने सांगितले होते. मात्र आता अचानक मेळाव्यास दिलेली परवानगी नाकारण्यात आली आहे.