राजकीय
ब्रेकिंग! ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा, मात्र फडणवीसांनी गेम फिरवला

- एकीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाव फिरवल्याचे दिसून येत आहे. मुंबईत आज सकाळी ताज लँड या हॉटेलात या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून मनसे आणि ठाकरे यांच्यातील युती होण्याच्याक्षणी फडणवीसांच्या एन्ट्रीने ट्विस्ट आला असून टायमिंग साधत फडणवीसांनी चाणक्य नीति वापरत राज यांना मोहरा बनवत उद्धव ठाकरेंचा गेम केल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे.
- मध्यंतरी उद्धव ठाकरेंना मनसे आणि ठाकरे गटात युती होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ठाकरेंनी संकेत काय बातमीच देतो, असे म्हणत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असे ठणकावून सांगितले होते. त्यांच्या या उत्तराने मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. मात्र, युती होण्याच्या अंतिमक्षणी फडणवीसांनी राजकीय चक्रं फिरवून शिवसेना-मनसे युतीला ब्रेक लावला जाण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. तर, दुसरीकडे ठाकरेंसोबतचे युतीचे पिल्लू सोडून उद्धव ठाकरेंना फक्त झुलवत ठेवले आणि डाव फडणवीसांनी साधल्याचे दिसून येत आहे.
- गेल्या काही दिवसांपासून मुंबईत हिंदी भाषिक, गुजराती, मासांहार हे मुद्दे वरचेवर वादाचे ठरत आहेत. त्यामुळे मराठी माणसावर परप्रांतियांची मुजोरी सातत्याने वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा स्थानिक मराठी माणसांना नक्कीच सुखावणारी होती. येत्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही युती सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखीच ठरणार होती. हा फटका भविष्यातील राजकारणाची दिशा बदलणारा ठरू शकतो, अशी भीती भाजपसह महायुतीतील अन्य पक्षांना आहे. त्यामुळे राज ठाकरेंचे मन आणि मतपरिवर्तन करण्यासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या असून फडणवीसांची ही भेट त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे.



