खेळ
ब्रेकिंग! टीम इंडियाने उधळला विजयाचा गुलाल
- टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 295 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांचे लक्ष्य होते, ज्याचा पाठलाग करणे जवळपास अशक्य होते. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 238 धावांवरच आटोपला. या विजयासह टीम इंडियाने कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळला जाईल.
- 534 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली. पदार्पण करणारा नॅथन मॅकस्विनी आपले खातंही उघडू शकला नाही. तो डावाच्या पहिल्याच षटकात बुमराहचा बळी ठरला. त्यानंतर नाईटवॉचमन पॅट कमिन्सला (2) मोहम्मद सिराजने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तिसऱ्या दिवसाची शेवटची विकेट बुमराहने मार्नस लाबुशेनच्या (3) रूपात घेतली.
- चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 12/3 असा खेळ सुरू केला. यानंतर सिराजने दिवसाच्या दुसऱ्याच षटकात उस्मान ख्वाजा (4) याला बाद केले. अशाप्रकारे 17 धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. यानंतर स्टीव्ह स्मिथ (17) आणि ट्रॅव्हिस हेड यांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. पण ही जोडी धोकादायक दिसत असतानाच सिराजने स्मिथला रिषभ पंतकडे झेलबाद केले.
- अखेर ट्रॅव्हिस हेडची (89) विकेट पडली. तो बुमराहच्या गोलंदाजीत पंतच्या हाती झेलबाद झाला. यानंतर काही वेळातच मिचेल मार्श (47) धावांवर बाद झाला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला. मार्श हा नितीश रेड्डीचा कसोटी क्रिकेटमधील पहिला विकेट ठरला. मिचेल स्टार्क (12) वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीत झेलबाद झाला. जो ऑस्ट्रेलियन संघाला आठवा धक्का होता.
- यानंतर सुंदरने लायनला (0) बाद करून ऑस्ट्रेलियाला नववा धक्का दिला. शेवटची विकेट ॲलेक्स कॅरीच्या (36) रूपाने पडली. त्याला हर्षित राणाने बोल्ड केले.