राजकीय
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची दांडी उडाली

- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
- लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेला काँग्रेस विधानसभेत मात्र ती कामगिरी करू शकला नाही. लोकसभेत हिरो ठरलेला पक्ष विधानसभेत मात्र झिरो ठरला आहे. मागिल विधानसभेला जिंकलेल्या जागाही काँग्रेसला कायम ठेवता आलेल्या नाहीत. काँग्रेसच्या दिग्गजांनाही पराभवाचा फटका सहन करावा लागला आहे. काँग्रेसचे अभेद्य असलेले गडही या निवडणुकीत कोसळले. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभेतल्या यशानंतर विधानसभेत सत्ता स्थापनेची स्वप्न काँग्रेस पाहात होती. पण त्यांचे हे स्वप्न धुळीला मिळाले.
- विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. लोकसभेत मिळालेल्या यशाच्या लाटेवर स्वार झालेल्या काँग्रेसला विधानसभेतही यश मिळेल, असे वाटत होते. पण त्यांचा हा अंदाज चुकला. याच फटका इतका मोठा होता की काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा झटका सहन करावा लागला. सलग आठ वेळा विजय मिळवलेल्या थोरात यांना त्यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात यावेळी पराभव स्विकारावा लागला. थोरातांप्रमाणेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री के. सी. पाडवी यांना पराभव स्विकारावा लागला.
- विदर्भातून आलेले निकालही धक्कादायक आहे. काँग्रेसने विदर्भातून अशा निकालाची कधी अपेक्षा केली नसेल. सावनेर हा काँग्रेसचा विदर्भातील अभेद्य गड होता. अनेक वर्ष या मतदारसंघातून सुनिल केदार हे प्रतिनिधीत्व करतात. पण यावेळी त्यांनी आपल्या पत्नीला मैदानात उतरवले होते. पण त्यांच्या पत्नीचा पराभव भाजपच्या आशिष देशमुख यांनी केला आहे.



