सोलापूर
ब्रेकिंग! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापुरात दिले चॅलेंज
- तेलंगणा राज्यात काँग्रेस सरकारने निवडणुकीत दिलेल्या 6 गॅरेंटीचे वचन पूर्ण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांनी दिलेल्या गॅरंटी बद्दल बोलत नाहीत. महायुतीकडून दोन वर्षाच्या सत्ता काळात लूट केली, त्याची चर्चा झाली नाही असा आरोप करत सोलापुरातील तेलुगु भाषिक नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. सोलापुरात तेलंगणा भवनसाठी एक कोटी रुपये देणार असल्याचे आश्वासन यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिले.
- सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ कुचन नगर आणि सुनील नगर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. प्रणिती शिंदे , माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर संजय हेमगड्डी, उमेदवार चेतन नरोटे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
- या सभेत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेलंगणात काँग्रेस सरकारने निवडणूक काळात दिलेल्या सहा गॅरेंटीच्या पूर्ततेचा आढावा मांडला. तेलंगणात शेतकऱ्यांचे 18 हजार कोटीचे कर्ज माफ केले. 50 हजार तरुणांना रोजगार दिला. महिलांसाठी प्रवास योजना या सह विविध योजना यशस्वीपणे राबविला जात आहेत. महाराष्ट्रात महायुती सरकारने केवळ लूट केली असल्याचा आरोप करत त्यावर या निवडणुकीत चर्चा व्हायला हवी होती असे सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या काळात कामे झाली नसल्याने ते काही बोलत नाही. काम करत नसल्याने ते बोलत नाही अशी टीका केली.
- तेलंगणात 50 हजार तरुणांना आम्ही रोजगार दिला. ते पाहण्यासाठी यायचे असेल तर हैदराबाद स्टेडियमवर त्या तरुणांना बोलवतो. त्यामध्ये एक जरी कमी दिसला तर जाहीर माफी मागेल, असे खुले आव्हान महायुतीला दिले. तेलंगणातील विकास कामे पाहण्यासाठी महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी अवश्य यावे. त्यांना येण्यासाठी अडचण असेल तर मी विमान पाठवितो, असेही खुले आव्हान तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिले.