ब्रेकिंग! एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व २८८ जागांचे निकाल आता समोर येत आहेत. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीने चमकदार कामगिरी केली आहे. महायुती सध्या २२० जागांवर आघाडीवर आहे. महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढचे मुख्यमंत्री कोण यावर आता चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आता मोठं विधान केले आहे. ज्यांच्या जास्त जागा, त्यांचा मुख्यमंत्री असे काही ठरलेले नाही, असे शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स वाढला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळाले आहे. महायुतीला २०० च्या वर जागा मिळाल्या असून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ५० हून अधिक जागांवर यश मिळाले आहे. या निकालावर शिंदे यांनी मीडियाशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे यांनी विजयाबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. हा डोंगराएवढा विजय आहे. आमचा मोठा विजय होईल, असा विश्वास मी आधीच व्यक्त केला होता. लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. लाडके भाऊ, लाडके शेतकरी या सर्वांनी आमच्यावर विश्वास दाखवला. त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो, असे शिंदे म्हणाले.
पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल आणि ते देवेंद्र फडणवीस असतील, असे भाजपकडून सांगितले जात आहे. त्यावरही शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्याच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री असे काही आमच्यात ठरलेले नाही. निकालाची सगळी आकडेवारी समोर आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून पुढील निर्णय घेऊ. ज्या पद्धतीने आम्ही एकदिलाने निवडणूक लढलो, त्याच पद्धतीने पुढचा निर्णय घेऊ, असे शिंदे म्हणाले.