सोलापूर
खा. प्रणिती शिंदे यांची मोठी घोषणा
- सोलापूर : महाविकास आघाडी सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषधे देण्यात येणार आहेत. महिलांना दरमहा 3 हजार रुपये मिळणार आणि मोफत बस प्रवास करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा जाहीरनामा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या खा. प्रणिती शिंदे यांनी येथे केले.
- विधानसभा निवडणुकीतील शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ आज इंदिरा नगर येथे सभा झाली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेला महिलांची मोठी गर्दी दिसून आली.
- यावेळी खा. प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात भाजपच्या कारभारावर हल्लाबोल केला. महाराष्ट्राचा विकास हाच महाविकास आघाडीचा ध्यास असल्याचे सांगत खा. प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, महाविकास आघाडी सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषधे मिळणार आहे. महिलांना दरमहा 3 हजार रुपये मिळणार आणि मोफत बस प्रवास करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्यात येईल. बेरोजगार तरुणांना दरमहा 4 हजार रुपयांची मदत करण्यात येईल. जातीनिहाय जनगणना करणार आणि 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेही आश्वासन यावेळी खा. प्रणिती शिंदे यांनी केले.
- उज्वल भविष्यासाठी जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या काँग्रेसला साथ द्यावी. काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहन खा. प्रणिती शिंदे यांनी केले.