राजकीय
ब्रेकिंग! ऐन निवडणुकीच्या काळात ठाकरे आक्रमक
- सध्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडू लागला आहे. स्टार प्रचारक आणि नेत्यांच्या सभांनी राजकारण तापू लागले आहे. दरम्यान, पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्या मंडळींना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला जाऊ लागला आहे. ठाकरे गटाने हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे.
- नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारीवरून ठाकरे गटात वाद सुरू आहेत. पक्षाने येथे संगीता पाटील डक यांना तिकीट दिले आहे. मात्र पैसे घेऊन आयात केलेला उमेदवार दिला गेला, असा आरोप माजी खासदार वानखेडे यांनी केला होता. त्यानंतर पक्षांतर्गत धुसफूस चांगलीच वाढली होती. निवडणुकीच्या काळात हा वाद परवडणार नाही याचा अंदाज पक्ष नेतृत्वाला आला होता.
- वानखेडे यांच्या या आरोपांनंतर ठाकरे गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले होते. जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली होती. नांदेड जिल्हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र थोरात नावाचा व्यक्ती नांदेड जिल्ह्यात आल्यानंतर त्याने पूर्ण शिवसेना विकून खाल्ली, असा आरोप वानखेडे यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर जिल्ह्यातील कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. या गोष्टी लक्षात आल्यानंतर पक्षाने कारवाईस सुरूवात केली.
- पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.