राजकीय
राहुल गांधी आज विधानसभेचा नरेटिव्ह सेट करणार
- राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जोमात सुरू आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले आहे. आता उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. स्टार प्रचारकांच्या सभा सुरू झाल्या आहेत. पण, अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. याचा मोठा फटका महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही बसणार आहे.
- दरम्यान, काँग्रेस व महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस आज प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून नागपुरात दुपारी एक वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत. तर संध्याकाळी पाच वाजता मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA मैदानात मविआची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ होणार असून या सभेत विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर करणार आहेत. परिणामी राहुल गांधी आज राज्यातील विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट करणार असल्याचे बोलले जात आहे.
- राहुल गांधी यांनी नागपूरमधून प्रचाराला सुरुवात करण्याचे देखील महत्त्व आहे. नागपूर हे विदर्भाचे केंद्र आहे. भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत असलेल्या 76 मतदारसंघांपैकी 36 मतदारसंघ विदर्भातील आहेत. हा राज्याचा कापूस पट्टा देखील आहे. राज्यातील सर्व विभागांमध्ये भाजपा विदर्भात सर्वाधिक 47 जागा जागा लढत आहे.
- आज संध्याकाळी राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार मुंबईत “स्वाभिमान सभेला” संबोधित करतील. महाविकास आघाडी यावेळी हमीपत्र जाहीर करु शकते. शेतकरी कर्जमाफी आणि जातीयगणना या प्रमुख हमी यात असण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेला विरोध करण्यासाठी एखादी योजना देखील जाहीर करू शकते.