राजकीय
माझा ‘माल’ असा उल्लेख केला, जनता 23 तारखेला तुमचे ‘हाल’ करणार
- सध्या राज्यातील विविध भागात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग आला आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीतील रंगत आणखी वाढणार आहे. दरम्यान शिवसेनेच्या दोन्ही गटांनी मुंबई आणि मुंबईतील मतदारसंघात चर्चेतील चेहरे दिले आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मुंबादेवी येथून शायना एन सी यांना तिकीट दिले आहे.
- दरम्यान, एकीकडे प्रचाराला वेग आलेला असताना त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांचा चांगलाच समाचार घेतला.
- सावंत यांनी शायना यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या याच विधानाचा आता शायना यांनी समाचार घेतला आहे. एका महिलेला ते ‘माल’ म्हणून संबोधत आहेत. जो महिलांचा आदर करेल, त्यालाच लोक निवडून देतील. आम्हीही सावंत यांचा प्रचार केला होता, असे त्यांनी म्हटले.
- माझा माल असा उल्लेख केला तर जनता तुमचे 23 तारखेला हाल करेल. महिलांबाबत असे बोलणाऱ्या पक्षांची मानसिकता दिसून येते, असेही म्हटले. यावेळी त्यांनी सावंतांची ऑडिओ क्लिप ऐकवली. तसेच 2014, 2019 सालच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने त्यांनी मते मागितली होती, अशी टीका शायना यांनी केली.