देश - विदेश
जय हिंद! भारताचा आणखी एक मोठा शत्रू गेला ढगात

- पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मिळणारा आश्रय आणि संरक्षण आता त्यांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. भारताने नुकत्याच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एक यश मिळवले आहे. जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेचा महत्त्वाचा नेता आणि IC-814 हायजॅक प्रकरणाचा मास्टरमाइंड रौफ अजहर याला पाकिस्तानात ठार मारण्यात आले आहे. रौफचा मृत्यू झाल्याची बातमी पाकिस्तानी माध्यमांमध्ये दाखवली जात आहे. ही कारवाई भारताच्या परकीय धोरणातील बदललेल्या दृष्टिकोनाची स्पष्ट झलक आहे, आमच्यावर हल्ला केलात, तर आम्ही घरात घुसून मारू!
- रौफ अजहर हा जैश-ए-मोहम्मदचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता होता आणि मसूद अजहरचा लहान भाऊ. 1999 साली इंडियन एअरलाईन्सच्या IC-814 विमानाचे अपहरण करण्यात आले होते. कंदहारमध्ये हे विमान उतरवण्यात आले आणि प्रवाशांच्या बदल्यात भारत सरकारला मसूद अजहरसह दोन इतर दहशतवाद्यांना सोडावे लागले. या संपूर्ण कटाचा मेंदू रौफ याचा होता. याच रौफने पुढे 2001 साली संसद भवनावर हल्ला घडवून आणला. 2019 च्या पुलवामा हल्ल्यात त्याचा अप्रत्यक्ष सहभाग होता. शिवाय, 2002 साली अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल यांची अपहरण करून हत्या केल्यामागेही याचे नाव होते.
- मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर लक्ष्य साधून हवाई हल्ला केला. यामध्ये रौफसह मसूद अजहरच्या कुटुंबातील दहा जण ठार झाल्याचे कळते.



