ब्रेकिंग! बाबा सिद्दीकी खून प्रकरणात पाकिस्तान कनेक्शन समोर
माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची वांद्रे परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत १४ आरोपींना अटक केली असून, गोळ्या झाडणारा शिवकुमार गौतम, झिशान अख्तर आणि शुभम लोणकर हे अद्याप फरार आहेत.
दोन वेगवेगळ्या टोळ्यांच्या गटांना हत्येची सुपारी देण्यात आली होती. सिद्दिकी मोठी व्यक्ती असल्याने त्यांच्या हत्येने खळबळ उडण्याची धोका असल्याने तसेच पैसे कमी दिल्याने एका गटाने माघार घेतली आणि दुसऱ्या गट तयार करून हत्याकांड घडवण्यात आले.
या शूट आऊट केसमध्ये आता पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून ड्रोनच्या सहाय्याने भारतात ही शस्त्र पाठवण्यात आली होती. त्यामध्ये तीन विदेशी तर एका देशी पिस्तुलाचा समावेश आहे.
सिद्दीकी गोळीबार प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने आणखी एक खुलासा केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत तस्करी करण्यात आलेली तीन विदेशी पिस्तुले भारताच्या सीमेवर ड्रोनद्वारे पोहोचवली गेली होती आणि नंतर हँडलर्सद्वारे मुंबईत पाठवली गेली.
हँडलर्समार्फत शस्त्रे मुंबईत पाठवल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन विदेशी पिस्तुल आणि एका देशी पिस्तुलाने हल्ला करण्यात आला. मात्र, विदेशी पिस्तुलांवर भारतात बंदी असताना ती भारतात आलीच कशी? असा प्रश्न आता बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर उपस्थित होत आहे. ड्रोनद्वारे ही शस्त्र पाकिस्तानातून राजस्थान किंवा पंजाब बॉर्डरवर मागवण्यात आली असावीत, असा क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.
बिश्नोई गँगपर्यंत ही शस्त्र पोहोचवण्यात पाकिस्तानी गँग किंवा ISI चाही हात असू शकतो. मात्र याचा खुलासा होण्यासाठी झिशान आणि लोणकर यांना अटक होणे तितकेच महत्वाचे आहे. पण सध्या ते दोघेही फरार असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.