प्रणिती शिंदे यांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि ठाकरे गट वादाची ठिगणी पडली आहे. ठाकरे गटाकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघात अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
मात्र, येथून काँग्रेसचे दिलीप माने इच्छुक आहेत. तशी तयारीही माने यांनी केली होती. पण, ऐनवेळी ठाकरे गटाने अमर पाटील यांना मैदानात उतरवले. त्यामुळे माने यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
त्या पार्श्वभूमीवर माने समर्थकांनी सोलापुरातील होटगी रोडवर काल बैठक बोलावली. तेव्हा, काहीही झाले, तरी निवडणूक लढण्याचा निर्धार माने यांनी व्यक्त केला. बैठक अर्ध्यावर आली असताना काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे तिथे आले. त्यांनी सेंट्रल पार्लमेंटरी पार्लमेंट्ररी बोर्डात दक्षिण सोलापूरची जागा काँग्रेसला सुटल्याचा खासदार प्रणिती शिंदे यांचा निरोप बैठकीत सांगितला.
एकीकडे माने यांची बैठक सुरू असताना ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना फोन केला. तेव्हा, राऊत यांनी अमर पाटील यांना सोमवारी ‘एबी’ फॉर्मसह अर्ज दाखल करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे.
त्यातच ठाकरे गट उपनेते शरळ कोळी यांनीही वादात उडी घेत काँग्रेसला इशारा दिला. शरद कोळी म्हणाले, अमर पाटील यांना दक्षिण सोलापुरातून उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूरची जागा काँग्रेसला मिळाल्याचे सांगून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या सगळ्या प्रकाराची मी अनिल देसाई यांना माहिती दिली. देसाई यांनी दक्षिण सोलापूरचा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काँग्रेसने आघाडी बिघाडी होईल, असे कृत्य करू नये. ‘सांगली पॅटर्न’ वापरण्याचा दबाव टाकू नये. आम्हालाही दबावतंत्र माहिती आहे. पण, महाविकास आघाडीत कुठलीही बिघाडी झाली नाही पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार करणे हेच आपले धोरण आहे, असे शरद कोळी यांनी सांगितले.