सोलापूर ब्रेकिंग! ट्रिपल सीट चालले ; ट्रॅफिक पोलिसांनी अडवले

सोलापूर (प्रतिनिधी) पोलीस कॉन्स्टेबलच्या अंगावर जाऊन शर्टाची कॉलर पकडून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १६ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड येथे घडली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बालाजी लक्ष्मण भंडारवाडा (नेमणूक शहर वाहतूक शाखा उत्तर विभाग) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष संजय कांबळे (वय-३९), मल्हारी सतीश काळे (वय-२७) व रोहित परमेश्वर कांबळे (वय-२९,सर्व राहणार सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी हे वाहतूक नियमांचे सरकारी कर्तव्य करीत असताना वरील संशयित आरोपी यांनी दुचाकी क्रमांक एमएच.१३.ई.एल.९५२२ वरून ट्रिपल सीट मार्केट यार्ड येथील गर्दीतून पुणे रस्त्याकडे जात होते. त्यावेळी त्यांना थांबवण्याचा इशारा केला असता ते न थांबता पुढे जात असताना फिर्यादी यांनी थांबवून पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन का करता अशी विचारणा केली.
त्यावेळी फिर्यादी यांना वरील संशयित आरोपी यांनी अरेरावी करीत अंगावर धावून येऊन फिर्यादी यांच्या वर्दीच्या शर्टाची कॉलर पकडली व तसेच तुला बघून घेतो असे म्हणून त्यातील संतोष कांबळे याने दारूच्या नशेत त्याच्या खिशातील ब्लेड काढून स्वतःहून हातावर वार करून जखमी झाला. तसेच फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कर्तव्यात अडथळा आणल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेचा पुढील तपास पोसई.डेरे हे करीत आहेत.



