ब्रेकिंग! भाजपचे पुन्हा धक्कातंत्र

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जागावाटपाबाबत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बैठका सुरू आहेत. अशातच भाजप आपल्या विद्यमान आमदारांना तिकीटे नाकारून नवीन चेहऱ्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची शक्यता आहे. तिकीट कापल्या जाणाऱ्या आमदारांमध्ये मुंबईतील पाच आमदारांचा समावेश आहे.
भाजपने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला. भाजप मुंबईतील ज्या पाच आमदारांची तिकीट नाकारू शकतात, त्यात वर्सोवा – भारती लव्हेकर, घाटकोपर पश्चिम – राम कदम, सायन – तमिळ सेल्वन, घाटकोपर पूर्व – पराग शाहा आणि बोरिवली – सुनील राणे यांचा समावेश आहे.
घाटकोपर पश्चिममधून राम कदम सलग तीन वेळा आमदार झालेत. मात्र त्यांची उमेदवारीही धोक्यात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाने सुमार कामगिरीचे कारण देत त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.



