ब्रेकिंग! लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार?
विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर आज महायुतीकडून संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी विरोधकांच्या आरोपांची यादी वाचली तर, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका रिपोर्टकार्डमध्ये मावणार नाहीत एवढी काम महायुती सरकारने केली आहेत, असे म्हणत अडीच वर्षांच्या कार्यकाळातील सरकारच्या प्रगतीचा पाढाच वाचून दाखवला.
पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र नंबर वन आहे. आम्ही एवढी कामे केली की ती रिपोर्ट कार्डमध्येही मावत नाहीत. अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोडचे काम सरकारने केल्याचे शिंदे म्हणाले.
विरोधकांना आरोप करण्याचा अधिकार जरूर आहे. परंतु, त्याला काही विषय आणि मर्यादा असायला हव्यात. आम्ही तिजोरी रिकामी केली, असा आरोप आमच्यावर केला. परंतु, मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की, सर्व योजनांचे नियोजन करूनच या योजना राबल्या आहेत. लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने विरोधक गडबडले आहेत, असे म्हणत अजितदादा यांनी विरोधकांच्या सगळ्यांच प्रश्नांना उत्तरे दिली.
अनेक उद्योग व्यवसाय आमच्या सरकारने आणले आहेत. परंतु, विरोधकांकडून कायम आरोप होतो की, उद्योग बाहेरच्या राज्यात गेले आहेत. परंतु, या आरोपांमध्ये तथ्य नाही. विरोधक फक्त नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत, असा थेट आरोप अजितदादा यांनी यावेळी केला. तसेच आगामी काळात लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करणार असल्याचे अजितदादा यांनी यावेळी स्पष्ट केले.