ब्रेकिंग! आणखी एक बडा नेता बिश्नोई गँगच्या टार्गेटवर?

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामागे आता बिश्नोई गँगचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. हत्या प्रकरणानंतर शुब्बू लोणकर नामक व्यक्तीच्या अकाऊंटवरून यासंदर्भात एक पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीने सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या पोस्टमध्ये सलमान खान आणि दाऊद गँगचाही उल्लेख करण्यात आला आहे. पोलीस आता यासंदर्भात तपास करत आहेत.
अशात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड देखील चर्चेत आले आहेत. कारण, काही महिन्यांपूर्वी आव्हाड यांना देखील धमकी देण्यात आली होती. सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या याच बिश्नोई गँगकडून आव्हाड यांनाही धोका असल्याची यामुळे आता चर्चा रंगू लागली आहे. मात्र, आव्हाड यांच्या सुरक्षेत अद्यापही कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
आता आव्हाड यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच आव्हाड यांच्या घराबाहेरदेखील सुरक्षा वाढवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.



