क्राईम

ब्रेकिंग! बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर आता मनसे कार्यकर्त्याचा खून

  1. काल रात्री मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच मुंबईत अजून एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची हत्या झाली आहे. मुंबईच्या मालाड पूर्वेमध्ये मनसे कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. मनसेकडून पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
  2. दरम्यान बाबा सिद्दिकी यांना वेगळा न्याय आणि मनसे कार्यकर्त्याला वेगळा न्याय का? असा सवाल मनसेकडून उपस्थित केला जात आहे. अधिकच्या माहितीनुसार, मुंबईच्या मालाड पूर्वेत दिंडोशी परिसरात मनसे कार्यकर्त्याची हत्या झाली. रिक्षा चालक आणि स्थानिक फेरीवाल्यांकडून मनसे कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. मनसे कार्यकर्त्याचे नाव आकाश माईन (वय २७ वर्ष) असे आहे.
  3. आकाश हे दसरानिमित्त काल संध्याकाळी नवीन गाडी घेण्यासाठी मालाड स्टेशनवर गेले होते. त्यावेळी मालाड पूर्वे स्टेशनजवळ रिक्षावाल्याने कट मारल्यामुळे मनसे कार्यकर्ता आणि रिक्षावाल्याबरोबर बाचाबाची सुरू झाली. मालाड स्टेशनवर असलेले रिक्षा चालकाचा मित्र, फेरीवाल्यांनी यावेळी गर्दी जमा करून दहा ते बारा लोकांनी आकाशवर हल्ला केला.
  4. रिक्षा आणि फेरीवाल्यांच्या या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रात्री बारा वाजता आकाशचा मृत्यू झाला. या हल्ला प्रकरणी दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपीचे शोध घेतला जात आहे.
  5. मनसेकडून पोलिसांवर आरोप करण्यात आला आहे. ज्या पद्धतीने सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवून दोन आरोपींना अटक केली आहे, तर इतर आरोपीचे शोध घेत आहेत. त्याच पद्धतीने पोलिसांनी मनसे कार्यकर्ता हल्ला प्रकरणी तपास वेगाने केला पाहिजे.

Related Articles

Back to top button