तिघे रिक्षाने आले, फटाक्यांच्या आवाजात गोळ्या झाडल्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री बाबा सिद्दिकी यांची वांद्रे पूर्व भागात काल रात्री तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली. निर्मल नगरयेथील कोलगेट मैदानाजवळ बाबा सिद्दिकी यांचा मुलगा व आमदार झीशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर घडलेल्या या घटनेनंतर दोघांना अटक करण्यात आली. तिसऱ्या आरोपीची ओळख पटल्याची माहिती आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाचे नाव करनैल सिंह असून तो मूळचा हरियाणाचा आहे. तर दुसऱ्या आरोपीचे नाव धर्मराज कश्यप असून तो उत्तर प्रदेशचा आहे. हल्लेखोर हे रिक्षाने घटनास्थळी आले. तर या हल्ल्यात चौथा व्यक्ती देखील होता. तो या तिघांना गाईड करत असल्याची माहिती आहे. सिद्दिकींच्या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात असल्याचे म्हटले जात आहे. तसेच एसआरए वादाच्यादृष्टीने देखील पोलिस तपास करत आहेत.
या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. मुंबई क्राइम ब्रँच या प्रकरणाचा तपास करत आहे. सिद्दिकी यांच्या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी काही व्यावसायिक वैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, सिद्दिकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या. सिद्दिकी यांना १५ दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्यांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती.
आरोपी हे रिक्षाने घटनास्थळी आले होते. हल्लेखोर हे बाबा सिद्दिकी याची वाट पाहत होते. यानंतर घटनास्थळी फटाके फोडण्यात आले. या आवाजाच्या आडून त्यांनी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान सिद्दिकी हत्या प्रकरणात साबरमती कारागृहात बंदिस्त असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या दृष्टीने मुंबई पोलिस तपास करत आहेत. पोलीस वेगवेगळ्या अँगलने या घटनेचा तपास करत आहेत.