नागपूर भूखंड घोटाळ्यात सोलापूर मनपा आयुक्त शितल तेली यांचेही नाव

नागपूर सुधार प्रन्यास प्राधिकरणमधील भूखंड प्रकरणी चौकशीच्या मागणी संदर्भात मला अधिक माहिती नाही. त्याप्रकरणी आदेशानुसार शासन जी आहे ती चौकशी करेल. माझी तर बदली तीन वर्षांपूर्वी तिथून (नागपूर) झाली होती” , अशी प्रतिक्रिया महापालिकेच्या आयुक्त शितल तेली – उगले यांनी पत्रकारांना दिली.
नागपूर सुधार प्रन्यास प्राधिकरणमधील भूखंड प्रकरणात तत्कालीन सभापती यांनी हा भूखंड देण्यासाठी नकार दिलेला असतानाही तत्कालीन नगरविकास मंत्री यांनी दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी अपील घेऊन, अंदाजे ८३ कोटी रुपये किंमतीचा हा भूखंड १६ बिल्डरांना २ कोटी रुपयांना भाडेतत्त्वावर देण्यासाठी आदेश दिल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.या प्रकरणात तत्कालीन सभापती दीपक म्हैसेकर, अश्विन मुदगळ, शीतल तेली उगले व मनोजकुमार सूर्यवंशी या चार अधिकाऱ्यांची चौकशी करून, त्यांचे फोन रेकॉर्ड तपासले पाहिजेत, अशी मागणी दानवे यांनी केली. या प्रकरणात २ अधिकारी हे आयएसएस आहेत. त्यामुळे त्यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री यांना माहिती दिली नव्हती का? याबाबतही चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, असे दानवे यांनी म्हटले आहे.