सोलापूर ब्रेकिंग! लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालूच राहील
सोलापूर :- राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील 2 कोटी 20 लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणांचा विचार प्रथम या शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत आहे. हा आनंद व समाधान टिकून राहण्यासाठी शासन ही योजना कोणत्याही अडचणी शिवाय पुढील पाच वर्ष चालू ठेवणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा अंतर्गत होम मैदान येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार जय सिध्देश्वर स्वामी, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, संजय शिंदे, शहाजी बापू पाटील, राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे पाटील, श्री. शिवाजी सावंत, महावितरण चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महापालिका आयुक्त शितल उगले तेली, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे डॉ. अमोल शिंदे, ज्योती वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना जून जुलै चे प्रति महा पंधराशे रुपये प्रमाणे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत. भाऊबीज नोव्हेंबर महिन्यात येत असल्याने राज्य शासनाने विचार करून याच महिन्यात भाऊबीज म्हणून थेट नोव्हेंबर महिन्याचे पैसेही बहिणींच्या बँक खात्यात जमा केलेले आहेत. या योजनेविषयी कोणी कितीही काही सांगितले तरी आम्ही ही योजना बंद करणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.