दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना खुशखबर
सोलापूर :- भीमा उजनी प्रकल्प अंतर्गत देगाव शाखा कालवा वितरिका क्रमांक एक व वितरिका क्रमांक दोन अंतर्गत 352 कोटीच्या कमांचे भूमिपूजन झाले. ही कामे पूर्ण झाल्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील दहा गावे व अक्कलकोट तालुक्यातील 25 गावांना लाभ होणार आहे. तसेच या दोन्ही तालुक्यातील गावांमधील एकूण 16 हजार 129 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन या भागातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
श्री क्षेत्र अक्कलकोट येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन व उजनीचे पाणी कुरनुर धरणात आल्याचे प्रीत्यार्थ जलपूजन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते. यावेळी माजी खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. समाधान आवताडे, आ. राम सातपुते, माजी आ. प्रशांत परिचारक, शहाजी पवार, यांच्यासह विविध गावचे सरपंच, सोसायटी चेअरमन, बाजार समिती संचालक, ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की विविध विकास कामाचे उद्घाटन करताना एक समाधान होत आहे की या कामातून सर्वसामान्यांना लाभ मिळणार आहे. उजनीचे पाणी कुरनूर धरणात आणले त्यामुळे पिण्याचे व शेतीच्या पाण्याचे सोय झाली. 27 वर्षापासून बंद असलेली एकरूख योजना सुरू झाली. या योजनेमुळे दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यांना फायदा होत आहे. अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 365 दिवस वीज पुरवठा केला जाणार आहे. या अंतर्गत शेतकऱ्याला सौर कृषी पंप घेताना फक्त एकूण रकमेच्या दहा टक्के रक्कम भरावयाचे आहे उर्वरित 90% रक्कम राज्य शासन देणार आहे. शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप बसवल्यानंतर त्याच्या दुरुस्ती व देखभालीसाठी पुढील पाच वर्ष खर्च शासन करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काळात त्यांना कृषी पंपाचे वीज बिल भरण्याचीच आवश्यकता राहणार नसल्याचे प्रतिपादन श्री. फडणवीस यांनी केले.
राज्य शासन अनेक लोक कल्याणकारी योजना राबवत असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना मुलींना उच्च शिक्षणात शंभर टक्के शुल्क सवलत आदी योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये ते म्हणाले की अक्कलकोट तालुक्याला मागील 75 वर्षापासून पाणी मिळालेले नाही परंतु या योजनांच्या भूमिपूजनामुळे हा तालुका पाणीदार होणार असून येथील शेतकरी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनेल असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देगाव शाखा कालवा अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. तसेच अमृत 2.0 योजनेअंतर्गत अक्कलकोट पाणीपुरवठा योजना, नगरोत्थान महा अभियानांतर्गत दुधनी शहर पाणीपुरवठा, मैंदर्गी पाणीपुरवठा, नगरोत्थान अंतर्गत अक्कलकोट शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन, अक्कलकोट दुय्यम निबंधक श्रेणी एक मुख्य इमारतीचे भूमिपूजन, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत टप्पा दोन कामाचे भूमिपूजन, पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.