खुशखबर! एसटी बसमध्ये येणार विमानाचा फील

हवाई सुंदरी हे विमान प्रवासाचे खास वैशिष्ट्ये असते. विमानात जशी हवाई सुंदरी प्रवाशांचे स्वागत करते. अगदी तशाच पद्धतीने आपल्या एसटी महामंडळाच्या ई-शिवनेरी बसमध्ये आता ‘शिवनेरी सुंदरी’ हसतमुखाने प्रवाशांचे स्वागत करताना दिसणार आहे. शिवसेना नेते व एसटी महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष भरत गोगावले यांनी याबाबत घोषणा केली आहे.
मात्र ही सेवा केवळ एकाच मार्गावर देण्यात येणार आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी प्रवाशांना मदत करण्यासाठी आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी शिवनेरी सुंदरी नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा दिली जाणार आहे. ही अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती गोगावले यांनी महामंडळाच्या बैठकीमध्ये दिली.
या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी शिवनेरी सुंदरी नेमण्यास मान्यता देण्यात आली. तसेच राज्यातील प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्रीसाठी नाममात्र भाडे आकारुन दहा बाय दहा आकाराचा स्टॉल उपलब्ध दिला जाणार आहे.