शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखावर गोळीबार
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि अमरावतीचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या कारवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास हा गोळीबार झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील वलगाव ते दर्यापूर मार्गावर ही घटना घडली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबट हे दर्यापूर येथील मूळ रहिवासी आहेत. अरबट हे अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेने जात होते. त्यावेळी धावत्या कारवर म्हणजे त्यांच्या इनोव्हा गाडीवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. तरी अचानक करण्यात आलेल्या या गोळीबारामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेनंतर अरबट यांनी पोलीसांत धाव घेत घटनेसंदर्भात माहिती दिली. दरम्यान मागील अनेक दिवसांपासून ठाकरे आणि शिंदे गट यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. त्यातून ही घटना झाल्याची शक्यता आहे.