महाराष्ट्र
राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून महाराष्ट्र तापले; ठिकठिकाणी आंदोलन

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील अकोला येथील पत्रकार परिषदेत सावरकर यांच्याविषयी घणाघाती टीका केली. त्यांच्या या टीकेवरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. ठिकठिकाणी राहुल यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे.
विरोधकांकडून वीर सावरकर यांच्या जन्मभूमीतही आंदोलनाला सुरूवात झाली आहे. या आंदोलनामध्ये भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे असे तिन्ही पक्ष सहभागी झाले आहेत. नाशिक येथील सावरकरांच्या जन्मभूमीपासून या आंदोलनाला सुरूवात झाली असून यात कॉंग्रेस विरोधात घोषणाबाजी केली.
राहुल यांच्या वक्तव्याचे पडसाद पुण्यातही उमटले आहेत. पुण्यात सकाळपासूनच आंदोलन सुरू आहे. सारस बागेत सावरकरांच्या पुतळ्यासमोर लावलेले बॅनर यावेळी फाडण्यात आले. भाजपने पुण्यात राहुल यांच्याविरोधात आंदोलन केले.
पुण्यातील कॉंग्रेस भवन येथे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये आंदोलकांनी घोषणाबाजी करत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. काल सोलापुरातही आंदोलन करण्यात आले.