पत्नीचा अकाली मृत्यू, विरहाने पतीने आयुष्य संपविले

इंदापूर तालुक्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी पत्नीचा मृत्यू झाल्याने नैराश्यात गेलेल्या पतीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. ही घटना भिगवण येथील मदनवाडी येथे आज दुपारच्या सुमारास घडली आहे.
गोपाळ उर्फ स्वप्नील प्रदीप सुतार (वय-२४) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. तर श्रावणी गोपाळ सुतार (वय.२०) यांचे डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदनवाडी येथील श्रावणी यांचे डेंग्यूच्या आजारामुळे शुक्रवारी निधन झाले होते.
या घटनेतून सावरत असतानाच श्रावणी यांचे पती गोपाळ हे आज दुपारी घरी बसले होते. त्यावेळी मला कंटाळा आलाय, मी जरा आराम करतो, असे सांगून एका खोलीत गेले. त्या खोलीच्या छताला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेवून त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान या घटनेमुळे श्रावणी आणि गोपाळ यांची सात महिन्यांची उर्वा ही चिमुकली पोरकी झाली आहे.