आमचे काय चुकले सांगा, फडणवीसांच्या भेटीला नाराजांच्या रांगा

राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, भाजपाकडून काल विधानसभेसाठी पहिली 99 जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. या यादीत अनेकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे जाहीर करण्यात आलेल्या यादीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आज नाराजांचा जनसागर उसळला आहे. पत्ता कट झालेले आणि अद्याप प्रतिक्षा यादीत असलेले इच्छुक उमेदवारांनी फडणवीसांची भेट घेत आमचं काय चुकले ? सांगा, असा सूर आळवला आहे. तर उमेदवारी घोषित झाल्यानंतर ती रद्द करून लेकाला द्यावी, यासाठी आईने मुंबईकडे धाव घेतली आहे.
विधानसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर नावे जाहीर झालेल्या उमेदवारांनी विजयासाठी कंबर कसली आहे. तर, दुसरीकडे पहिल्या यादीतून नाव न आल्याने आणि काहींचा पत्ता कट झाल्याने मुरजी पटेल, भारती लव्हेकर, भीमराव तापकीर, बबनराव पाचपुते यांनी फडणवीसांची भेट घेतली. तर आमदार सत्यजित तांबे ‘मेघदूत’ बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते.
जाहीर करण्यात आलेल्या 99 जणांना उमेदवारीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, घरात उमेदवारी मिळूनसुद्धा प्रतिभा यांनी मुंबईकडे धाव घेत फडणवीसांची भेट घेतली आहे. स्वतः ऐवजी मुलगा विक्रमसिंह यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. परिणामी आता त्यांच्या या मागणीवर पक्षश्रेष्ठी आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



