क्राईम
जमिनीच्या वादातून दुहेरी हत्याकांड; सात आरोपींना जन्मठेप
जमिनीच्या वादातून दोघांना पळवून नेऊन लाकडी दांडका आणि दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ९ पैकी ७ आरोपींना जन्मठपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पुण्यातील राजगुरुनगर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी काल शिक्षा सुनावली आहे.
रोहिदास उर्फ गणपत उर्फ बाळू जयसिंग ठाकर (वय-३९, मयत), राजु जयसिंग ठाकर (वय-३६), संतोष जयसिंग ठाकर (वय-२४), प्रितम उर्फ रोड्या पंडीत ठाकर (वय-१९), जगदीश उर्फ गोट्या शिवाजी ठाकर (वय-२१), चंद्रशेखर शिवाजी ठाकर (वय-१९), तुषार प्रल्हाद ठाकर (वय-१९) आणि रघुनाथ दामू पारखी (वय-५७, सर्व रा. माण, ता. मुळशी) अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत.
ही घटना चाकण जवळच्या पिंपरी खुर्द हद्दीत ११ जुलै २००९ रोजी भर दुपारी घडली होती. या घटनेत पंढरीनाथ सदाशिव पारखी (वय-६०) आणि चंद्रकांत उर्फ पप्पु ज्ञानोबा पारखी (वय-३७) या दोघांचा खून करण्यात आला होता.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मयत चंद्रकांत उर्फ पप्पु पारखी याने खरेदी केलेली ७३ गुठे जमीन मयत आरोपी रोहिदास ठाकर याला विक्रीच्या हेतूने साठेखत करून दिली होती.
रोहिदास याला मुदतीत हा व्यवहार पूर्ण करता आला नाही. त्यावरुन पुणे न्यायालयात वाद सुरू होता. न्यायालयाने खून झालेल्या पारखी याच्या बाजूने निकाल दिला होता. याचाच राग ठाकर परिवाराला होता. दरम्यान, मयत चंद्रकांत आणि चुलते पंढरीनाथ हे चाकण शेळी बाजारात शेळ्या विक्रीसाठी आले होते. त्यांच्यासोबत आरोपी झालेले रघुनाथ पारखी हेही होते.
बाजारातील काम उरकल्यावर चाकण ते रोहकल रस्त्यावर काही अंतरावर आरोपींनी त्यांना गाठले. जबरदस्तीने पिंपरी खुर्दच्या आडरानात नेऊन सर्वांनी दोघांवर लाकडी दांडकी आणि दगडांनी हल्ला केला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
कुणालाही या घटनेचा थांगपत्ता लागू नये, यासाठी पुरावे नष्ट केले.पंढरीनाथ यांचा मुलगा संदीप पारखी याने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. दोन परिवारातील वाद माण परिसरात माहिती असताना देखील सुरुवातीला वेगळ्याच आरोपींना अटक झाली होती, मात्र हा तपास पुढे सीआयडीकडे देण्यात आला. पोलिस निरिक्षक दिपाली घाडगे यांच्या पथकाने आरोपी शोधून काढले. आरोपींना अटक करण्यात आली. ते दोन वर्षांनी जामिनावर बाहेर आले.
२०१४ मध्ये राजगुरुनगर न्यायालयात हा खटला सुरू झाला. विशेष सरकारी वकील विजय सावंत यांनी खून झालेल्या पारखी यांची बाजू न्यायालयात मांडली. एकुण २० साक्षीदार तपासण्यात आले. साक्ष आणि पुराव्यांनुसार निर्दयीपणे खून करणाऱ्या आरोपींना न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी जन्मठेप, दोन हजार रुपये दंड, अपहरण व कट कारस्थान यासाठी पाच वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.