महाराष्ट्र
संजय राऊतांची पोस्ट अन् पोलिसांची धाड

- विधिमंडळ आमदारांची समिती धुळे जिल्हा दौऱ्यावर असताना या समितीसाठी कोट्यावधी रुपयांचा मलिदा देण्यासाठी धुळ्यातील शासकीय विश्रामगृहावर कोट्यावधी रुपये जमा करण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला होता. त्यानंतर पोलिसांनी धाड मारली. यावेळी रुम नं 102 मध्ये पोलिसांना एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड आढळून आली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- यासंदर्भात राऊत यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. राऊत पोस्टमध्ये म्हणाले, विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आली असता, या समितीला मलिदा देण्याकरता जवळपास साडेपाच कोटी रुपये धुळे शासकीय विश्रामगृह गुलमोहर येथे रूम नंबर 102 मध्ये जमा करण्यात आले होते. त्या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सदरच्या रूमला कुलूप लावून पहारा ठेवला आहे.
- या पोस्टनंतर अनेक तास उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याची टीकाही राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये केली होती. त्यानंतर पोलिसांना शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली. या खोलीत मोठ्या प्रमाणावर रोकड रक्कम असून त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार गोटे यांनी केली होती. रक्कम असल्याची खात्री झाल्यानंतर पोलीस अधिकारी, बांधकाम विभागातील अधिकारी व महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पंचनामा करण्यात आला.



