तू मला आवडत नाहीस, पतीचे टोमणे

राज्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तू मला आवडत नाहीस, तुझे बाहेर कोणासोबत तरी अनैतिक संबंध सुरू आहेत, अशा वारंवारच्या टोमण्यांमुळे विवाहितेने गळफास घेत आपले जीवन संपवले. ही घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सरलांबे गावात घडली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती आणि सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
कृतिका वैभव म्हात्रे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार शिवीगाळ आणि मानसिक त्रास देत होता. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कृतिका कंटाळली होती. तू मला आवडत नाहीस, तुझे बाहेर अनैतिक संबंध आहेत, असे आरोप करत विवाहितेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेचा पती, सासू-सासरा आणि दीर या चौघांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील कृतिका हिचा विवाह काही महिन्यापूर्वी शहापूर तालुक्यातील सरलांबे येथील वैभव अधिकारी या तरुणाशी झाला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसातच तिला सासरचे लोक त्रास देऊ लागले. तू मला आवडत नाहीस. तुझे बाहेर अनैतिक संबंध आहेत, असे म्हणत वैभव कृतिकाला त्रास देऊ लागला.



