सोलापूर
सोलापुरात किरकोळ कारणावरून राडा

- सोलापूर (प्रतिनिधी) किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर बिराजदार व प्रशांत कोळी (रा.श्रीशैल नगर,भवानी पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रोहन अशोक कोरे (वय-२१, रा. श्रीशैल नगर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
- ही घटना १७ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एस व्ही सी एस हायस्कूल भवानी पेठ येथे घडली.
- याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी व फिर्यादी यांचे मित्र ओंकार भिसे, गणेश कोळी, अविनाश भिसे असे तिघेजण मिल्क शेक पीत उभे होते. त्यावेळी वरील संशयित आरोपी हे समोरून जात असताना फिर्यादीच्या मित्रांसोबत चेष्टा मस्करी चालू होती. फिर्यादी व मित्र यांचे जोरजोराचे हसणे बघून वरील संशयित आरोपी याने तू मला बघून का हसत आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्यादी याने आम्ही तुला बघून हसत नाही. आमचा वेगळा विषय चालू आहे, असे सांगत असताना फिर्यादीला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर प्रशांत कोळी याने फिर्यादी यांच्याबरोबर असलेला मित्र भांडण सोडवण्याकरिता मध्ये आला असता त्याला देखील ढकलाढकली केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार दुधाळे हे करीत आहेत