सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी घोषणा!

महाराष्ट्रात आता शासन सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्मच्या मदतीने “आपले सरकार” पोर्टलवरील पाचशेहून अधिक सेवा थेट व्हॉट्सॲपवर उपलब्ध होणार आहेत.
राज्यात मोबाईल फोनचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे. आतापर्यंत ऑनलाईन सेवा उपलब्ध असूनही काही नागरिक ऑनलाईन प्रक्रियांपासून दूर राहायचे. मात्र, व्हॉट्सॲपचा सहज आणि सर्वदूर वापर पाहता आता शासनाच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ थेट व्हॉट्सॲपद्वारे घेता येणार आहे. या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रात “व्हॉट्सॲप गव्हर्नन्स” चा नवा अध्याय सुरू होत आहे. या नव्या योजनेमुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि वेगवान सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आपले सरकार व्हॉट्सअँप चॅटबॉट संदर्भात माहिती तंत्रज्ञान विभाग आणि मेटा यांच्यात बीकेसी येथे सामंजस्य करार झाला.
दरम्यान फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा भविष्यातील रोडमॅप आणि राज्य सरकारच्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली. फिनटेक आणि ‘एआय’ क्षेत्रातील स्टार्टअप्सला गती देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत असून देशात महाराष्ट्र राज्य स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे. जेव्हा आपण ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहतो, तेव्हा तंत्रज्ञान हा विकासाचा मुख्य आधारस्तंभ असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.



