क्राईम
पाच वर्षीय मुलीला गुप्तांगाजवळ दिले गरम चटके
- राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका सावत्र आईने पाच वर्षीय मुलीला शरीरभर चटके दिल्याची हादरवून टाकणारी घटना घडली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील कासरवाडी गावात ही घटना घडली. या प्रकरणी शुभम मगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पूजा मगरे हिच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पूजा या सावत्र आईला ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील कासरवाडी गांव इथं मूळचे जालना जिल्ह्यातील शुभम मगरे हा पत्नी पूजा आणि पाच वर्षीय सावत्र मुलगी राणी यांच्यासह कासारवाडी भाड्याच्या घरात राहण्यास आहे.
- शुभम आणि पूजा यांचा हा विवाह दुसरा आहे. पहिल्या पत्नीपासून शुभम यांना एक मुलगी आहे. ही मुलगी शुभम यांच्याकडेच राहावयास आहे. दरम्यान काल शुभम हे कामानिमित्त बाहेर गेले असताना ही घटना घडली आहे.
- दरम्यान सावत्र मुलीने अंथरूणात लघुशंका केली होती. त्यामुळे बिछाना ओला झाला होता. याच कारणामुळे पूजा या संतापल्या होत्या. त्यामुळेच पूजा यांनी मुलीच्या गालावर, गळ्यावर, ओठावर आणि गुप्तांगाच्या बाजूला गरम चटके दिले होते. या घटनेनंतर चिमुकलीच्या तोंडावर भाजल्याचे डाग होते.
- मुलीला शरीरभर खूप ठिकाणी जखमा झाल्या होत्या. मुलगी लहान असल्यामुळे झालेल्या जखमांचे गांभीर्य तिच्या लक्षात आले नाही. तिच्या जखमा पाहून शेजारच्यांनी तिची विचारपूस केली. तरीही चिमुकली हसत -खेळत होती. गावातील सरपंचाला याबाबत कळताच त्यांनी वडिलांना जाब विचारला. त्यानंतर मुलीचे वडील शुभम याने शिरोली पोलिसात तक्रार दिल्याने सावत्र आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.