पुढील दोन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या बंद होणार?
सध्या दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. दुसऱ्या बाजूला सरकारदेखील या वाहनांना प्रोत्साहन देत आहे. दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांबद्दल एक वक्तव्य केले आहे. गडकरी म्हणाले की, पुढील दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती या पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांइतक्याच होतील. ऑटोमोटिव्ह कम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एसीएमए) ६४ व्या वार्षिक सत्रात ते बोलत होते. गडकरी म्हणाले, अर्थमंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान दिल्यास आणखी फायदा होईल. तसेच त्या अनुदानास आमचा पूर्ण पाठिंबा असेल.
यावेळी गडकरी यांनी स्पष्ट केले की, इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आता अनुदानाची आवश्यकता भासणार नाही. कारण इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवरील खर्च कमी होणार आहे. ग्राहकदेखील आता पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय स्वीकारत आहेत.
गडकरी पुढे म्हणाले, मी पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या विरोधात नाही. मात्र भारताचे पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करायला हवे. आपण दर वर्षी २२ लाख कोटी रुपये केवळ पेट्रोल-डिझेलवर खर्च करतो. त्याऐवजी आपण इलेक्ट्रिक वाहने व इथेनॉलसारख्या बायोफ्यूलवर लक्ष द्यायला हवे.