लाडक्या बहिणींनो, पैशांचे टेन्शनच घेऊ नका
राज्य सरकारने अलीकडे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेला सोलापूरसह अन्य भागात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या योजनेत सध्या अनेक बदल सुरु आहेत. या योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच आता सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांचे अर्ज हे अंगणवाडी सेविकांकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. बाकी इतर कोणालाही आता अर्ज मंजूर करण्याची परवानगी नसणार आहे. यासह आता साडे चार हजार रूपये नेमके महिलांच्या खात्यात कधी जमा होणार? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
जुलै महिन्यात या योजनेची घोषणा झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांची 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला. त्यामुळे या महिलांच्या खात्यात दीड हजार रूपये जमा झाले नव्हते. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला, त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित साडे चार हजार रूपये जमा होणार असल्याची माहिती आहे.