लाडकी बहीण योजनेचा महायुतीला किती फायदा?

राज्यात विधानसभा निवडणुकीचे घमासान सुरू झाले आहे. महविकास आघाडी की महायुती कोण बाजी मारणार याचे उत्तर निकालानंतर मिळेलच पण आतापासूनच विजयाचे दावे केले जात आहेत. यातच काही ओपिनियन पोलसुद्धा समोर आले आहेत. ताज्या पोलनुसार या निवडणुकीत भाजपा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो, असा अंदाज बांधण्यात आला आहे. पण मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला कमी जागा मिळतील, अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
टाइम्स नाऊ नवभारतने केलेल्या एका सर्वेमध्ये असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढाई होणार आहे. महायुतीला 137 ते 152 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला 129 ते 144 जागा मिळतील असा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा मिळेल का, असा प्रश्न विचारला जात आहे. या संदर्भातही सर्वे करण्यात आला. 58 टक्के लोकांच्या मते ही योजना खूप चांगली आहे. 24 टक्के लोकांना वाटते की, ही योजना काही प्रमाणात चांगली आहे. तर सहा टक्के लोकांना वाटते की, या योजनेचा महायुतीला निवडणुकीत काहीच फायदा मिळणार नाही.



