क्राईम
वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी कारवाई
- राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपींना कोयते तसेच पिस्तूल पुरवल्याप्रकरणी गुन्हे शाखेने एकाला अटक केली. संगम संपत वाघमारे (वय २०, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वनराज खून प्रकरणात आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात वनराज यांच्या बहिणीलाही अटक करण्यात आली असून तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान या खून प्रकरणाचा गुन्हे शाखेकडून सखोल तपास करण्यात येत आहे. आरोपींना शस्त्रे पुरवण्यात वाघमारे सामील होता. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, हवालदार जाधव, मोकाशी यांच्या पथकाने सापळा लावून वाघमारेला पकडले. वाघमारेला अटक करून न्यायलायात हजर करण्यात आले. त्याला ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या खून प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी १५ आरोपींना अटक केली असून पसार झालेल्या दोघांचा शोध घेण्यात येत आहे.