क्राईम
मेहंदी क्लास संपवून घरी निघाली; वाटेत नियतीने डाव साधला
- राज्यात हिट अँड रनच्या घटना थांबण्यास तयार नाहीत. भरधाव वेगातील कारने लोकांना चिरडल्याच्या घटना रोजच ऐकायला येत आहेत. आताही अशीच भीषण घटना मुंबईत घडली आहे. एका आलिशान कारने एका निष्पाप महिलेचा जीव घेतला आहे. भरधाव कारच्या धडकेत एका 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. कारचालकाने आधी या महिलेला जोराची धडक दिली. नंतर दुभाजकापर्यंत फरपटत नेले. या घटनेने खळबळ उडाली आहे.
दरम्यान नागरिकांनी कारचालकाला पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीत कारचालक जखमी झाला आहे. तसेच संतापलेल्या लोकांनी कारचीही तोडफोड केली आहे. येथील एक महिला मेहंदी क्लास संपवून घरी निघाली होती. त्याचवेळी भरधाव वेगात असलेल्या कारने जोराची धडक दिली. यानंतरही कारचालकाने कार थांबवली नाही तर या महिलेला रस्ता दुभाजकापर्यंत फरपटत नेले. अपघात घडताच येथील नागरिकांनी धाव घेतली. येथील प्रत्यक्षदर्शींनी आणि कारचालकाने महिलेला रुग्णालयात दाखल केले. पण उपचाराआधीच या महिलेचा मृत्यू झाला.
या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी सुरुवातीलाच कारचालकाला ताब्यात घेतले आहे. कार चालवताना तो शुद्धीत होता की त्याने मद्यपान केले होते, याची माहिती अजून समोर आलेली नाही. याची खात्री करण्यासाठी मालाड पोलिसांनी कारचालकाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.