क्राईम

इन्स्टाग्रामवर मिळाली लिंक, पैसे डबल करायला गेला

सोशल मीडियावर अनेक जाहिराती, लिंक येतात आणि त्यावर पैसे कमविण्याबाबत माहिती दिलेली असते. पैसे कमविण्याच्या लोभाने अनेक तरुण या फसवणुकीचे बळी पडतात. अशीच घटना नवी मुंबईतील तरुणासोबत घडली आहे. ऑनलाईन गेम खेळून पैसे कमविण्याच्या नादात तरुणाने 40 लाख रुपये गमावले आहे.

नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणासोबत हा प्रकार घडला आहे. त्याला इंस्टाग्रामवरून ऑनलाईन गेमिंगबाबत माहिती मिळाली होती. इंस्टाग्रामवर मिळालेल्या लिंकवर त्याने क्लिक केले असता त्याला या गेमिंगमधून भरपूर पैसे मिळणार असल्याची माहिती मिळाली. पैसे मिळणार या आशेने त्याने त्यावर नोंदणी केली आणि गेम खेळण्यास सुरूवात केली.

दरम्यान ऑनलाईन गेम खेळून त्याचा खूप फायदा होत आहे आणि त्यातून त्याला कोट्यवधी रुपये मिळणार असल्याचे भासवण्यात आले. ही रक्कम जर खात्यात मिळवण्याची असेल तर काही शुल्क भरावे लागेल, असेही सांगण्यात आले. त्यांच्याकडून वेगवेगळे शुल्क आकारण्यास सुरुवात केली. आपल्याला कोट्यवधी रुपये मिळणार या आशेने तरुण शुल्क भरत राहिला.

तरुणाने 40 लाख रुपये भरल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने या फसवणूक प्रकरणाची कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांकडून आता अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Related Articles

Back to top button