क्राईम

सख्खा भाऊ अन् वहिनीनेच काढला काटा

राज्यात काही दिवसांपू्र्वी खुनाचा एक अतिशय भयानक प्रकार उघडकीस आला होता.  पुणे शहरात एका तरुणीचा खून करून तिच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करुन फेकले होते. संगमवाडी येथील नदीपात्रात या तरुणीचे धड पोलिसांना आढळले होते. खून झालेल्या या तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला आहे. पोलिसांच्या तपासातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयत तरुणीचे मारेकरी दुसरे तिसरे कुणी नसून तिचाच सख्खा भाऊ आणि वहिनी आहेत. खोलीच्या मालकीच्या वादातून ही भयानक हत्या झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीपात्रात आढळून आलेला मृतदेह सकिना खान नावाच्या तरुणीचा होता. झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सख्खा भाऊ आणि वहिनीने तिची हत्या केली. घरातील धारदार शस्त्राने मृतदेहाचे अनेक तुकडे केले. ज्या दिवशी पुण्यात खूप पाऊस होता, त्या दिवशी संगमवाडी नदीपात्रात फेकून दिले. त्यानंतर सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती शेजाऱ्यांना दिली.
मात्र संशय आल्यावर शेजारच्या लोकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली आणि हत्येचा उलगडा झाला. पोलीसांनी सकिनाचा भाऊ अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांना अटक केली आहे. पुण्यातील पाटील इस्टेट भागतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून ही हत्या घडली. ही खोली सकिनाच्या नावावर होती. सकिनाचा भाऊ आणि वहिनी तिला घरातून निघून जाण्यास सांगत होते. मात्र सकिना खोली सोडण्यास तयार नव्हती. अखेर भाऊ आणि वहिनीने तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

Related Articles

Back to top button