क्राईम

बहीण भावाकडे निघाली ; पुढे घात झाला

मुंबई-पुणे रस्त्यावर खडकी रेल्वे स्थानक परिसरात भरधाव एसटी बसने मोटारीला धडक दिल्याची घटना रविवारी घडली. अपघातात मोटारीतील भूमी अभिलेख विभागातील अधिकारी महिलेचा मृत्यू झाला. 
अपघातात महिलेचा पती आणि मोटार चालक भाऊ, तसेच दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात एसटी बसमधील १२ प्रवासी जखमी झाले. 
मनिषा विजयसिंह भोसले (वय ४०, रा. कवठे महंकाळा, जि. सांगली) असे मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एसटी बसचालक अनंत पंजाबराव उईके (वय ३३, रा.नारायणगाव) याला ताब्यात घेतले असून खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा भोसले आणि त्यांचे पती शासकीय अधिकारी आहेत. मनिषा यांची नुकतीच पुरंदर तालु्क्यात बदली झाली होती. त्या पिंपरीतील चिखली भागात राहणाऱ्या भावाकडे आल्या होत्या. दरम्यान पुरंदरला बदली झाल्याने भोसले यांनी हडपसर भागात भाडेतत्वावर घर घेतले आहे. रविवारी सकाळी मोटारीतून भोसले, त्यांचे पती आणि भाऊ हडपसरकडे निघाले होते. एसटी बस शिवाजीनगर स्थानकातून नारायणगावकडे निघाली होती.
खडकी रेल्वे स्थानक परिसरात समोरून येणाऱ्या भरधाव एसटी बसने मोटारीला धडक दिली. अपघातात मोटारीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर एसटी बसचालकाचे नियंत्रण सुटले. एसटी बसने एका मोटारीला आणि दुचाकीस्वाराला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातानंतर रहिवासी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारीत अडकलेल्या तिघांना बाहेर काढून तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान भोसले यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Related Articles

Back to top button