महिलांना मिळणार पाच लाखांची मदत

आवश्यक कागदपत्रे- आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, बँक खाते तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो.
देशातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, त्यांना जगण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील असते. त्यामुळे मागील काही वर्षात महिलांसाठी अनेक मोठमोठ्या योजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत. लखपती दीदी योजना हा त्याचाच एक भाग आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे. ही योजना सुरु करण्याचा मुख्य उद्देश म्हणेज पुरुषांप्रमाणेच महिलांचासुद्धा उद्योग क्षेत्रात सहभाग वाढावा, असा आहे. लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.
या योजनेअंतर्गत देशभरातील खेड्यातील दोन कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे आणि दुरुस्ती करणे अशा अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. ही योजना प्रत्येक राज्यातील स्वयं-सहायता गटांमार्फत चालविली जाते. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
पात्रता –अर्जदार महिला भारताची नागरिक असावी. तिचे वय १८ ते ५० वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे. सदर महिलेचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. अर्जदार महिलेच्या घरातील कोणीही सरकारी कर्मचारी नसावा. महिलांना बचत गटामध्ये सहभाग घेणे अनिवार्य आहे.
अर्ज कसा करावा?- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ‘सेल्फ हेल्प ग्रुप’ व्यवसाय योजना तयार करावी लागेल. या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल. या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल. या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल. त्यानंतर सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल.