क्राईम

ब्रेकिंग! नराधमाला तत्काळ फाशीची शिक्षा होणार का ?

अलीकडे महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असून आता बदलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली आहे.

या प्रकारानंतर पोलीस आणि शाळा प्रशासनाच्या दिरंगाईवर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून शाळेच्या गेटसमोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात असून पीडित मुलीचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तब्बल बारा तास ताटकळत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागरिकांनी शहरात बंदची हाक दिली आहे. संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकावर जाऊन रेल रोको केल्याचे समोर येत आहे. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे म्हणाले, मी पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. याप्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा होईल. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. कर्मचारी कामावर ठेवताना पूर्ण चौकशी करणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित संस्थेवरही कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत. या प्रकरणात संस्थाचालकाची चूक असेल तर त्यांचीही चौकशी करायला सांगितले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावरही मी कारवाई करण्यास सांगितले आहे, असे ते म्हणाले.

Related Articles

Back to top button