नराधमाने कोवळ्या जीवांना ओरबाडले, राज्य हादरले
एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बदलापुरातील या घटनेच्या निषेधार्थ आज आंदोलन सुरू आहे. संतप्त झालेल्या आंदोलकांना रेल्वे रुळावर उतरून आंदोलन सुरू केले. यामुळे येथील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. आरोपीला फाशी द्या अन्यथा आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात होती. मागील चार तासांपासून आंदोलन सुरू होते. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे आंदोलकांना रेल्वे रुळावरून हटवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यामुळे आणखीच संतप्त झालेल्या आंदोलकांनी थेट दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि नागरिक प्रचंड संतापले आहेत. बदलापूर बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे. मात्र, तीन तास उलटूनही शाळा प्रशासनाकडून नागरिकांशी चर्चा करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद राहिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अनेक तास उलटूनही मुलींच्या पालकांची तक्रार दाखल करुन घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.