जरांगे, लाडकी बहीण, कटेंगे-बटेंगे नाही तर ‘या’ फॅक्टरमुळे पराभव

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निकालावर आज ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. हा विजय जनतेच्या मनातला नाही, असे म्हणत त्यांनी या विजयावर आक्षेप नोंदवला. हा निकाल जनतेच्या मनातला विजय नाही. पहिल्या दोन तासांत चाललेली बरोबरीची लढाई अचानक कशी बदलते..? पुढच्या दोन तासांत जे निकाल लागले ते संशयास्पद आहेत. सरकार विरोधात सगळीकडे वातावरण असताना, हे यश कसे मिळाले, हा संशोधनाचा विषय आहे.
महाराष्ट्रातील आजच्या निकालाला राऊत यांनी न्या. धनंजय चंद्रचूड यांना जबाबदार धरले. ते म्हणाले, राज्यातील या सगळ्याला जबाबदार कोण असेल, तर ते सर न्यायधीश डी. वाय चंद्रचूड. देशाचे सर्वोच्च न्यायालय आहे. त्या न्यायालयाने आमदार अपात्रतेच्या संदर्भात वेळेत निर्णय द्यायला हवा होता. पण अडीच वर्षे निर्णय झाला नाही. मग अडीच वर्षे निर्णय होत नसेल तर मग तुम्ही खुर्चा कशाला उबवताय? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
राज्यात निवडणुकीदरम्यान महिला सुरक्षेचा मुद्दा, मराठा आरक्षणाचा मुद्दा, लाडकी बहीण योजना, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है असे अनेक मुद्दे चर्चेत आले होते. मात्र या विधानसभा निवडणुकीत मतविभागणी हा सर्वात मोठा फॅक्टर ठरला. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात मत विभागणीसाठी महायुतीने अडथळे निर्माण केले. याचा फटका आम्हाला बसला. मनसे आणि वंचित आघाडीला मॅनेज करून आमचे उमेदवार पाडण्यात आले, असा आरोप राऊत यांनी केला आहे.