क्राईम
पतीसोबत लफडं, पत्नीने पुण्यातील IT पार्कमधून तरुणीला उचललं

- पुण्यातील हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीचे अनैतिक संबंध रोखण्यासाठी संतप्त पत्नीने थेट पतीच्या प्रेयसीचेच अपहरण करून बेदम मारहाण केली. काल सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे आयटी पार्क परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने हालचाल करत पीडित महिलेला सुखरूप सोडवले असून आरोपी पत्नी, तिचा भाऊ आणि आई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- काल सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ब्रम्हा क्रॉप फेज-२, विप्रो सर्कल येथे पीडित महिला आपल्या कार्यालयात कामात गर्क होती. त्याचदरम्यान तिच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. तुमचे पार्सल द्यायचे आहे, असे सांगत तिला ऑफिसबाहेर येण्यास सांगण्यात आले. ती बाहेर पडताच निळ्या रंगाच्या कारमधून संतप्त पत्नी, तिचा भाऊ आणि आई उतरले आणि महिलेला जबरदस्तीने कारमध्ये ओढून बसवले. त्यानंतर कार ताथवडे आणि वाकड परिसरात फिरवली गेली. या दरम्यान प्रेयसीला बेदम मारहाण करण्यात आली.
- कारमध्ये आरोपी पत्नीने प्रेयसीला धमकावत दम दिला. माझ्या नवऱ्याचा नाद सोड, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे तिने तिला बजावले. त्यानंतर तिला शिवीगाळ करत संतापाच्या भरात मारहाण करण्यात आली. तब्बल दोन- अडीच तास हा थरार सुरू होता. दरम्यान या अपहरणाची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तातडीने हालचाल केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता आरोपी पत्नी आणि तिचे साथीदार महिलेला जबरदस्तीने कारमध्ये कोंबत असल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यावरून पोलिसांनी वाहनाचा क्रमांक शोधून काढला. वाकड परिसरातून ही कार ताब्यात घेऊन पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली.
- या प्रकारानंतर आरोपी पत्नी, तिचा भाऊ आणि आई यांच्याविरोधात अपहरण व मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नवऱ्याचे अनैतिक संबंध थांबवण्यासाठी हे कृत्य केले, अशी कबुली आरोपी पत्नीने चौकशीत पोलिसांना दिली आहे.



