लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राजकीय पक्षाकडून त्या दृष्टिकोनातून मोठी तयारी केली जात आहे.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरले आहेत. सध्या ते पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशातच राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते तसेच आमदार हे ज्येष्ठ नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याने अजितदादा यांनी आपल्याच आमदारांचा निधी रोखून धरल्याची माहिती आहे. कामांना मंजुरी मिळाल्यानंतर संबधित आमदारांनी पक्षबदल केल्यास त्यांना याचा राजकीय फायदा होऊ नये, यासाठी अजितदादा खबरदारी घेत असल्याचे समजते.
अजितदादा यांच्या या नव्या धोरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. तळ्यात-मळ्यात असलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मतदारसंघातील विविध विकासकामे करण्यासाठी आमदार ‘डीपीसी’च्या माध्यमातून निधीची मागणी करीत असतात.
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदारांनी विविध कामांचे प्रस्ताव अजितदादा यांच्याकडे दिले आहेत. त्यापैकी तब्बल 1256 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार पुन्हा शरद पवार गटाच्या परतीच्या वाटेवर आहे.
ही बाब अजितदादा यांच्या लक्षात येताच त्यांनी आमदारांचा निधी रोखला असल्याची चर्चा आहे. संबंधित आमदारांना जर विकासकामांच्या निधीचे वाटप केले आणि त्यानंतर त्यांनी पक्षबदल केला तर त्यांना राजकीय फायदा होऊ शकतो, त्यामुळेच हा निधी रोखला असल्याचे समजते.