खेळ

ब्रेकिंग! टी 20 वर्ल्डकपच्या आयोजनात गोंधळ

अमेरिकेत टी 20 वर्ल्डकपचे आयोजन करणे आता आयसीसीला चांगलेच महागात पडले आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटीमध्ये भारत पाकिस्तानसह आठ सामने आयोजित करण्यासाठी आयसीसीने कोट्यवधी रुपये खर्च केले होते. या पैशांतून येथे तात्पुरत्या स्वरुपात एक स्टेडियम आणि खेळाडूंना सरावासाठी व्यवस्था करण्यात आली होती. अमेरिकी क्रिकेट संघाला आयसीसीने निलंबित केले होते. त्यामुळे हे सगळे काम एक कंपनी स्थापन करून आयसीसीने स्वतः च केले.

आयसीसीच्या बोर्ड सदस्यांना हा विश्वास देण्यात आला होता की, जास्त दरात तिकीट विकून हा तोटा भरून काढण्यात येईल. पण तसे काहीच घडले नाही. त्यामुळे बीसीसीआयचे अनेक बोर्ड सदस्य नाराज आहेत. आता 19 ते 22 जुलै दरम्यान श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. याबाबत आयसीसीच्या काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी होण्याचीही मागणी केली जाऊ शकते. अशी परिस्थिती असताना या बैठकीआधीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयसीसीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. यामागे टी 20 वर्ल्डकपच्या आयोजनातील गोंधळ असल्याचे सांगितले जात आहे.
यंदा अमेरिका आणि वेस्टइंडिज या दोन देशांत टी 20 विश्वकप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या नियोजनावर मोठी टीका झाली होती. यामध्ये आयसीसीला मोठे नुकसानही झाले आहे. यानंतर इव्हेंट हेड ख्रिस टेटली आणि मार्केटिंग कम्युनिकेशनचे महाव्यवस्थापक क्लेअर फर्लांग यांनी राजीनामा दिला आहे. आयसीसीच्याच सदस्यांनी या स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आयसीसीने बॅलेटमधून काही तिकिटे प्रशासकांना दिली आणि नंतर भारत- पाकिस्तान सामन्यांच्या तिकिटांची विक्री झाली, असे दाखवण्यात आले. नंतर तिकिटे कमी किमतीत मार्केटमध्ये आणण्यात आली. ज्या व्यक्तीला काहीच अनुभव नव्हता, अशा व्यक्तीला तिकिटांची जबाबदारी देण्यात आली होती. इतकेच नाही तर या स्पर्धेच्या संचालनासाठी टी 20 विश्वकप युएसए नावाने एक कंपनी स्थापन करण्यात आली होती. या कंपनीत अशा व्यक्तीची नेमणूक करण्यात आली, ज्या व्यक्तीला काही दिवसांपूर्वीच आयसीसीने काढून टाकले होते.

Related Articles

Back to top button