मनोरंजन

ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की

बहुचर्चित सिनेमा ‘धर्मवीर-2’ चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाबाबत सध्या उत्सुकता आहे. येत्या 9 ऑगस्ट रोजी हा सिनेमा मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी ही प्रवीण तरडे यांनी निभावली आहे.

या चित्रपटाच्या टीझरमध्ये सुरुवातीलाच जबरदस्त डायलॉग दिसून येत आहेत. सुरुवातीलाच एक मुस्लिम महिला राखी बांधायला दिवंगत नेते आनंद दिघेंकडे येते.
इतर महिलादेखील मोठ्या संख्येने तेथे राखी बांधायला आल्या असतात. तेव्हा एक मुस्लिम महिला बुरखा बांधून दिघे यांना राखी बांधण्यास येते. अशावेळी तिला दिघे आपला बुरखा काढून चेहरा दाखवायला लावतात. तिने चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचे त्यांना कळते आणि दिघे त्यावर संतापतात. राखी बांधायला राज्यभरातून आलेल्या समस्त बहिणींना घेऊन ते त्या महिलेच्या घरी जातात.
याचवेळी ‘ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की!’, असा डायलॉग दिघे म्हणताना दिसून येतात. यामध्ये दिघेंच्या हिंदुत्वाची झलकदेखील पाहायला मिळते. त्यामुळे आता या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. धर्मवीर आनंद दिघेंची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओकने साकारली आहे.

Related Articles

Back to top button